कीव,
Ukraine attacks Russian oil plant युक्रेनने रशियाच्या राजधानी मॉस्को परिसरातील एका मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर जोरदार ड्रोन हल्ला केला असून या घटनेनंतर परिसरात मोठी आग लागली आणि आकाशात काळ्या धुराचे लोट दिसू लागले. या आठवड्यात युक्रेनकडून रशियावर करण्यात आलेला हा दुसरा मोठा हल्ला मानला जात आहे.हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा हल्ला “न्याय्य प्रत्युत्तर” असल्याचे सांगत, रशियाने कीव आणि इतर शहरांवर केलेल्या हल्ल्यांना उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडेच रशियाने कीवसह अनेक शहरांवर मोठा हवाई हल्ला केला होता, जो गेल्या काही महिन्यांतील सर्वात विनाशकारी हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. या हल्ल्यात काही ठिकाणी जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली होती.दरम्यान, यापूर्वी युनेस्को सूचीतील कीव-पेचेर्स्क लावरा परिसरातील एका कॅथेड्रलवर झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा ताजा हल्ला अधिक तीव्र प्रतिसाद मानला जात आहे.
झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, रशियाच्या युद्धयंत्रणेला पाठबळ देणाऱ्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली असून युद्ध थांबवण्यासाठी आता संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.दुसरीकडे, रशियन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की देशभरात तब्बल ५५५ युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले असून मॉस्कोकडे येणारे सुमारे २०० ड्रोन निष्प्रभ करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मॉस्कोतील प्रमुख विमानतळांवरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आंतरराष्ट्रीय बैठकीत भाग घेत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या तणावामुळे रशिया-युक्रेन संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.