६२ हजार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसविणे बाकी

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
३० जूनपर्यंत शेवटची तारीख
 
वाशीम, 
vehicle number plates केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार सर्व मोटार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पट्टी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसवून घ्यावी, अन्यथा १ जुलै २०२६ पासून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.
 
 
Vehicle number plates
 
वाहनांच्या क्रमांक पट्टीमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, रस्त्यांवरील वाहनांची अचूक ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित व नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसविणे बंधनकारक केले आहे. वाशीम जिल्ह्यासाठी एचएसआरपी बसविण्याचे काम रोझमेर्टा सेफ्टी सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले असून, वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून क्रमांक पट्टी बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांची संख्या १ लाख २१ हजार असून त्यापैकी ५८ हजार ९८९ वाहनांवर एचएसआरपी बसविण्यात आली आहे. मात्र, अद्याप ६२ हजार ११ वाहनांवर एचएसआरपी बसविणे बाकी आहे. त्यामुळे उर्वरित वाहनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 
प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्वनियोजित वेळ नोंदविलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र मुदत संपल्यानंतर एचएसआरपी नसलेल्या जुन्या व नव्या सर्व वाहनांवर वायुवेग पथकांमार्फत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.कोटवाहनांच्या सुरक्षिततेसह राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पट्टी (एचएसआरपी) बसविणे अत्यंत आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात अद्याप ६२ हजारांहून अधिक वाहनांवर एचएसआरपी बसविणे बाकी आहे. वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी. अंतिम मुदतीनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून तातडीने नोंदणी करून एचएसआरपी बसवून घ्यावी.