खा. देशमुख पक्ष सोडणार यात नवल नाही
अभय इंगळे
दिग्रस,
washim mp sanjay deshmukh यवतमाळ वाशीम लोकसभा खासदार संजय देशमुख आणि दिग्रस विधानसभा आमदार संजय राठोड या दोन संजयांचे निश्चित मिलन होणार यावर चांगलीच चर्चा होती. बुधवार, 16 जूनला संजय देशमुख यांनी उबाठा शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने हे दोन संजय आता एकत्र येणार आहेत. खा. देशमुखांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर संजय देशमुखांच्या फोटोखाली ‘आम्ही सदैव भाऊसोबत..’ असे म्हणत उबाठा सेना सोडण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले. याचाच अर्थ खा. संजय देशमुख यांनी पक्ष सोडण्याची पूर्वकल्पना त्यांच्या निकटवर्तींना दिल्याचे स्पष्ट होते.
तसेही विधानसभा निवडणुकीपासून संजय देशमुख यांची मंत्री संजय राठोड यांच्याशी जवळीक अनेकदा दिसून आली. हा चर्चेचा खास विषय होताच. यांच्या हितसंबंधांवर शिक्कामोर्तब झाल्यास एकमेकांचे पक्के वैरी यापुढे एकत्र नांदतील, अशी चर्चा आहे. राजकारणात पक्षांतर ही एक सामान्य पण संवेदनशील बाब आहे, जी सत्तेचे गणित आणि स्थानिक राजकारणावर थेट परिणाम करते. मात्र खासदार संजय देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत याची कधीच पर्वा केली नाही. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचे फारसे नवल त्यांच्या समर्थकांत नसल्याचे दिसून येत आहे. खासदार संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश घेणार हे जरी आज जाहीर झाले नाही तरी उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे देशमुखांवर विश्वास ठेवतीलच, हे सांगणे कठीण आहे.
खा. संजय देशमुख यांचा हा शेवटचा प्रयत्न..!
खा. संजय देशमुख हे 1992 ला काँग्रेस पक्षात होते. 1996 ला ते शिवसेनेत गेले. मात्र 1999 ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. यानंतर सतत 2009 पर्यंत अपक्ष म्हणूनच राहिले. मात्र अचानक त्यांनी 2017 ला भाजपात प्रवेश घेतला. आता कायमच भाजपात राहू, असे ते सर्वांनाच म्हणत होते. मात्र त्यांच्या मनात काही वेगळेच शिजत होते. भाजपात एकसे बढकर एक धुरंधर नेते बघून आपली डाळ येथे शिजणार हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता 2024 ला उबाठा सेनेत प्रवेश घेतला आणि खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांना हवे तसे वातावरण तेथे दिसत नसल्याने अखेर एकनाथ शिंदेंसोबतत जाण्याचा निर्णय घेऊन टाकला. आता खा. देशमुख यांना मंत्री संजय राठोड यांच्याशी जुळवून घ्यावे लागणारच असे दिसत आहे.