नागपूर,
NEET राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (नीट) पुनर्परीक्षा २१ जून रोजी सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी नागपूर प्रशासन आणि पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी अंतिम तयारीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही त्रुटी राहू न देण्याचे निर्देश दिले.
१२ हजारांहून अधिक उमेदवार
यंदाच्या पुनर्परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३० परीक्षा केंद्रांवर सुमारे ११,९८४ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये नागपूर शहरातील २९ तर बुटीबोरी येथील एका केंद्राचा समावेश आहे. परीक्षा केंद्रांवर प्रकाशयोजना, आसनव्यवस्था, जनरेटरद्वारे वीजपुरवठा, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- प्रश्नपत्रिका बँक लॉकरमध्ये सुरक्षित
प्रश्नपत्रिका भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून नागपुरात आणण्यात आल्या असून त्या कडक पोलीस बंदोबस्तात तीन बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या ताबा व वाहतुकीसाठी पोस्टमास्टर जनरल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था
प्रश्नपत्रिकांचे वितरण सशस्त्र पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार असून प्रत्येक मार्गाचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर स्थानिक पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात राहणार आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी २९ अधिकारी, ४१४ पोलीस कर्मचारी आणि जवळपास ३० एस्कॉर्ट वाहने नियुक्त करण्यात आली आहेत.
शनिवारी रंगीत तालीम
परीक्षेपूर्वी २० जून रोजी प्रश्नपत्रिका वाहतूक, सुरक्षा तैनाती, दळणवळण व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. संभाव्य त्रुटी दूर करून विविध यंत्रणांमध्ये समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रश्नपत्रिका गळती, गैरप्रकार किंवा कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर कडक निगराणी ठेवण्यात येणार आहे. परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि घटनामुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.