उच्च शिक्षणाला उद्योगांची जोड

एईडीपीने उघडले करिअरचे नवे दालन

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
apprenticeship-embedded-degree-program : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत उच्च शिक्षण अधिक कौशल्याधारित आणि उद्योगाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबतच उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि दरमहा सुमारे १२,५०० रुपयांचे मानधन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
 
 
ngp
 
 
शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव
 
 
एईडीपी अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या सहाव्या आणि सातव्या सत्रात संबंधित उद्योग, संशोधन संस्था किंवा कंपन्यांमध्ये एक वर्षाची संरचित अप्रेंटिसशिप पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यापूर्वीच उद्योग क्षेत्रातील अनुभव, व्यावसायिक कौशल्ये आणि कार्यसंस्कृतीची ओळख होणार आहे.
 
या कार्यक्रमात विद्यापीठ शैक्षणिक अभ्यासक्रमाची जबाबदारी सांभाळणार, तर उद्योग प्रशिक्षण व कौशल्यविकासाची संधी उपलब्ध करून देणार आहेत. वाणिज्य, विज्ञान आणि मानवविद्या शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
 
नागपूर विद्यापीठात ११ अभ्यासक्रम
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुमारे ३२० प्रवेशक्षमतेसह ११ अभ्यासक्रमांमध्ये एईडीपीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, ड्रोन सायन्स, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, कॉर्पोरेट प्रशासन, अर्थशास्त्र आणि पर्यटन अशा विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे.
 
रोजगारक्षम पदवीधर घडविण्याचा प्रयत्न
 
 
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर आणि प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांनी एईडीपीमुळे कौशल्यविकास, उद्योग-विद्यापीठ सहकार्य आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांची प्रभावी सांगड घालणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी भविष्याभिमुख संधी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.