अमरावती,
b-t-deshmukh-passes-away : विदर्भ सिंचन अनुशेष निर्मूलन महर्षी व गाढे अभ्यासक माजी आमदार प्रा. बी. टी. उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. शनिवार २० जून रोजी सांयकाळी ५ वाजता त्यांच्यावर अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात विवाहीत मुलगी, भाऊ नाना देशमुख यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघाचे ते सलग ६ वेळा आमदार राहीले आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते. सरकारला अनेक शैक्षणिक सुधारणा करण्यास बाध्य करून शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या. विशेष म्हणजे विदर्भाच्या सिंचनासह अन्य क्षेत्रातल्या अनुशेषाचा मुद्दा त्यांनी अभ्यासपूर्ण समोर आणला होता. विदर्भाचा उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वच क्षेत्रातला विकासाचा अनुशेष किती तीव्र आहे, या संदर्भात त्यांनी सखोल मांडणी वेळोवेळी केली.
तेव्हा विधीमंडळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी. टी. देशमुख यांच्या मुद्दाला बळ दिले होते. परिणामस्वरूप तत्कालीन काँग्रेस शासनाला बी. टी. यांच्या मागण्यांची वेळोवेळी दखल घ्यावी लागली. अमरावती शहरासह अन्य शेकडो गांवाची तृष्णातृप्ती करणारे अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. पेढी धरणासाठी त्यांचा आग्रह होता. कोळशावर आधारीत नांदगाव पेठ येथील रतन इंडीय औष्णीक विद्युत प्रकल्पाला त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला. नैतिकता जोपासून त्यांनी अखेरपर्यंत कार्य केले. अनेकांच्या ते आदर्शस्थानी होते. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना ह्रदयाचा त्रास होता. शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता त्यांना तीव्र धक्का बसाला त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेत शोकसंवेदना व्यक्त केल्या.