इस्लामाबाद
Bhutto's aggression against India भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी कराराचा वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. करार निलंबित झाल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने आक्षेप नोंदवले जात असताना आता तिथल्या नेतृत्वाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. . बिलावल भुट्टो झरदारीयांनी अलीकडील भाषणात सिंधू नदीच्या पाण्यावरील पाकिस्तानचा हक्क कायम राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तान आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभा राहील आणि पाणी रोखण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सिंधू पाणी करारावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्यामागे सीमापार दहशतवाद हा प्रमुख मुद्दा असल्याचे भारताचे मत आहे. भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत दहशतवादाविरोधात ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत या विषयावर कोणतीही मवाळ भूमिका घेतली जाणार नाही.भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिंधू पाणी करार हा कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय करार नसून बदलत्या परिस्थितीनुसार त्याचा फेरविचार होऊ शकतो, असे भारताने ठामपणे मांडले आहे. दहशतवाद आणि करार एकत्र चालू शकत नाहीत, हा संदेश भारताकडून सातत्याने देण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर या विषयावर सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत असून, सिंधू पाणी कराराचा मुद्दा आगामी काळात भारत-पाक संबंधांमधील सर्वात संवेदनशील विषयांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.