मुंबई,
BJP leader Prasad Lad's jibe राज्यातील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा सूर अधिक तीव्र झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार हे सतत माध्यमांसमोर येत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडत असल्याने ते आता “छोटे संजय राऊत” बनण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला प्रसाद लाड यांनी लगावला.अलीकडच्या काळात रोहित पवार विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते राज्यातील विविध घडामोडींवर त्यांनी उघडपणे भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांची माध्यमांमधील उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांची वक्तव्ये ही केवळ पोकळ दावे असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या आक्रमक भाषाशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “फक्त बोलण्यापलीकडे प्रत्यक्ष कृती दिसत नाही,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच शिवसेनेतील खरी ताकद कुणाकडे आहे, यावरही प्रसाद लाड यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडेच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसैनिकांचा मोठा वर्ग शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधला. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.