नागपूर,
CA Final Result द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)च्या मे २०२६ मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नागपूरसह विदर्भातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. नागपूर केंद्रावरून परीक्षेला बसलेल्या ८१८ विद्यार्थ्यांपैकी १३८ जणांनी यश संपादन केले.
धीरज जग्यासी प्रथम
नागपूर केंद्रातील गुणवंतांमध्ये धीरज पंकज जग्यासी यांनी ४२१ गुणांसह प्रथम, अनया दारव्हेकर ४१० गुणांसह द्वितीय, नमन कुमार सिंह ४०१ गुणांसह तृतीय, उर्वी प्रमेंद्र शाह ३९३ गुणांसह चतुर्थ आणि आयुष अग्रवाल ३८६ गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. अंतिम परीक्षेत दोन्ही गटांसाठी बसलेल्या २४९ विद्यार्थ्यांपैकी ३१ जण उत्तीर्ण झाले. ग्रुप-१ मध्ये ३४५ पैकी २२, तर ग्रुप-२ मध्ये २२४ पैकी ४९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. हर्षित प्रशांत नेरकर यांनीही अंतिम परीक्षा उत्तीर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली.
प्रेरणेतून यशाकडे वाटचाल
यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रवासात कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्त्वाची ठरली. धीरज जग्यासी यांना सीए असलेल्या आतेबहिणीकडून प्रेरणा मिळाली, तर अनया दारव्हेकर यांनी वडिलांकडून प्रेरणा घेतली. नमन कुमार सिंह यांनी मित्राच्या सल्ल्याने सीएची वाट निवडली आणि कुटुंबातील पहिले सीए होण्याचा मान मिळविला. उर्वी शाह यांनी मोठ्या बहिणीच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला, तर आयुष अग्रवाल यांनी काकांच्या मार्गदर्शनामुळे हे क्षेत्र निवडल्याचे सांगितले. हर्षित नेरकर यांनीही कुटुंबाच्या पाठबळामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले.
कॉर्पोरेट क्षेत्राकडे कल
यशस्वी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कॉर्पोरेट क्षेत्रात अनुभव घेऊन त्यानंतर स्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा मानस व्यक्त केला. निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.