अनिल कांबळे,
नागपूर,
candidate-disqualified-for-the-job : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केलेल्या नागपूरच्या एका तरुणीला हातावरील हायपरट्रॉफिक स्कार (केलॉईड- जखमेचे व्रण) असल्याच्या कारणावरून वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवत उमेदवाराला दिलासा दिला आहे. हातावरील जखमेच्या डागामुळे उमेदवाराला नोकरीसाठी अपात्र ठरवता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
कुमारी अरुंधती यांनी कर्मचारी निवड आयोगाच्या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत त्यांना प्रथम दृष्टीदोषाच्या कारणावरून अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर पुनर्वैद्यकीय तपासणीत उजव्या हातावरील हायपरट्रॉफिक स्कार हे कारण देत उमेदवारी नाकारण्यात आली. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दावा केला की, एम्स नागपूरच्या वैद्यकीय अहवालानुसार हा व्रण संसर्गजन्य नसून उपचारक्षम आहे. तसेच भरती जाहिरातीत अशा प्रकारच्या व्रणाचा अपात्रतेच्या निकषांमध्ये उल्लेखही नाही.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने यापूर्वीच्या विविध न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत केलॉईड किंवा हायपरट्रॉफिक स्कार हा कायमस्वरूपी शारीरिक दोष मानता येत नाही आणि केवळ त्या कारणावरून उमेदवाराला अपात्र ठरविता येणार नाही, असे स्पष्ट केले. न्यायमूर्ती वाय.जी.खोब्रागडे आणि न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांच्या खंडपीठाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजीचा पुनर्वैद्यकीय मंडळाचा अहवाल रद्दबातल ठरविला. तसेच, याचिकाकर्ती इतर सर्व निकषांमध्ये पात्र असल्यास तिच्या उमेदवारीचा पुनर्विचार करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. या निर्णयामुळे केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अपात्रतेच्या निकषांबाबत महत्त्वाचा न्यायनिवाडा झाला असून, अशाच कारणांमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणात पीडित तरुणीची बाजू ॲड. राजेंद्र साहू, ॲड. गुरप्रीतसिंह चंडोक आणि ॲड. गौरव साहू यांनी मांडली.