अभियंता उदय शेळके यांचा दावा
गतिरोधकांचा वाद तापला
पारवा,
Engineer Uday Shelke घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरातील तेलंगण नांदेड राज्य महामार्गावर लावण्यात आलेले गतिरोधक गायब झाल्याप्रकरणी नवा वाद समोर आला आहे. हे गतीरोधक निकृष्ट दर्जामुळे फुटले नसून, काही नागरिकांनीच ते सबलीच्या साहाय्याने उखडून फेकून दिल्याचा खळबळजनक दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उदय शेळके यांनी केला आहे. या प्रकारामुळे आता प्रशासन विरुद्ध स्थानिक नागरिक असा नवा संघर्ष उभा राहिला आहे. पारवा चौफुलीवरून जाणारा हा महामार्ग अत्यंत व्यस्त असून, पारवा पेट्रोल पंप, जांब आश्रमशाळा, गावाजवळ आणि टॉवर जवळील धोकादायक वळणावर अपघातांचे सत्र सुरू होते. ‘तरुण भारत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवले होते. मात्र, काही दिवसांतच हे गतिरोधक गायब झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
(संग्रहित छायाचित्र)
आम्ही आरटीओच्या परवानगीनेच गतिरोधक लावले - इंजिनियर उदय शेळके
या गंभीर विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उदय शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विभागाची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली. ते म्हणाले, आम्ही आरटीओकडून रीतसर परवानगी घेऊन, सर्व तांत्रिक बाबी तपासून अत्यंत दर्जेदार गतिरोधक लावले होते. ते गतिरोधक स्वतःहून फुटलेले नाहीत, तर काही लोकांनी सबलीने ते मुद्दाम उखडून टाकले आहेत. ज्या ठिकाणाहून गाड्यांचे चाक जाते, बरोबर तिथूनच हे गतिरोधक काढण्यात आले असून याचे फोटो पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. पुढे बोलताना उदय शेळके म्हणाले की, काही वाहनधारकांना तिथे ब्रेक दाबावा लागत होता, त्यांना गती कमी करण्याचा त्रास होत होता. म्हणूनच त्यांनी हे गतिरोधक सबलीने उखडून टाकले. आम्ही प्रत्येक वेळेस तिथे जाऊन पाहू शकत नाही. यात सामान्य नागरिकांची सुद्धा काही सामाजिक जबाबदारी आहे की नाही?
या प्रकारामुळे आम्ही स्वतः त्रस्त झालो असून, आता सरकारी कामात अडथळा आणणाèया आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाèया अशा प्रवृत्तींविरोधात पोलिस तक्रार करावी का, असा विचार आम्ही करत आहोत. अपघातांची भीती कायम, तोडगा काढण्याची मागणी दरम्यान, अधिकाèयांनी नागरिकांवर दोषारोप केला असला, तरी जांब आश्रमशाळेजवळील विद्यार्थी आणि पारवा पेट्रोल पंपाजवळील वाहनधारकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. गतिरोधक गायब झाल्यामुळे वेगवान वाहनांमुळे पुन्हा अपघातांची मालिका सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. बांधकाम विभाग आणि पोलिसांनी मिळून यावर ठोस तोडगा काढावा आणि दोषींवर कारवाई करून सुरक्षिततेसाठी पुन्हा दर्जेदार गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.