वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गिरगाव जंगल परिसरातील घटना

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |

नागभीड,
Farmer killed in attack by tiger चराईसाठी शेळ्यांना जंगलात घेऊन गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना तालुक्यातील गिरगाव नजीकच्या जंगलात कक्ष क्रमांक 535 मध्ये शुक्रवार, 19 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्माराम दसरू बोरकर (52, रा. गिरगाव) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. गिरगाव येथील रहिवासी आत्माराम बोरकर हे नेहमीप्रमाणे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास शेळ्यांना चराईसाठी गावालगतच्या जंगलात घेऊन गेले होते. शेळ्या कक्ष क्रमांक 535 मध्ये चरत होत्या.

 

tiger 

सायंकाळी त्या घराकडे परतल्या. मात्र एक शेळी न आल्यामुळे आत्माराम तिला आणण्यासाठी पुन्हा जंगल परिसरात गेले. यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. बराच वेळ होऊनही आत्माराम घरी न परतल्याने कुटुबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, रात्रभर शोधाशोध करूनही त्यांचा पत्ता लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी कुंटूबियांनी गावकर्‍यांच्या मदतीने जंगलालगत शोध घेतला असता, गिरगांव नियतक्षेत्र 535 मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. सहायक वनरक्षक महेश गायकवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, क्षेत्रसहायक हिंगणकर, वनरक्षक मेकेवाड, तळोधीचे ठाणेदार राहुल गुहे व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी नागभीडला पाठविण्यात आला.