आता जिल्ह्यातील बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
- मान्सूनच्या विलंबाने ग्रामीण अर्थचक्र ठप्प

गोंदिया, 
farmers await the rain वेळेवर मान्सून दाखल होईल, या आशेवर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतीची पूर्वतयारी, घरांची दुरुस्ती, धान्य साठवण तसेच अन्य हंगामी कामे पूर्ण केली होती. मात्र जून महिना अर्धा उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजालाही आता पावसाची प्रतीक्षा आहे.
 
 
Farmar
 
दरवर्षी पावसापूर्वी ग्रामस्थ घरांची डागडुजी, कौले बदलणे, धान्य सुरक्षित ठेवणे यासाठी मोठा खर्च करतात. यंदाही अनेकांनी पदरमोड करून ही कामे पूर्ण केली. परंतु पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबांची आर्थिक चिंता वाढली आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्याची वेळ जवळ आल्याने पालकांवरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे. शासनाकडून पुस्तके व वह्या उपलब्ध होत असल्या तरी गणवेश, प्रवास, शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्चासाठी आवश्यक असलेली रक्कम उभारणे अनेक कुटुंबांसाठी कठीण ठरत आहे. जूनचा अर्धा महिना संपूनही बहुतांश भागात पेरण्यांना सुरुवात झालेली नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगाम खोळंबला असून त्याचा परिणाम पुढील रब्बी हंगामावरही होण्याची भीती कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यातच पावसाअभावी शेतमजुरांनाही रोजगार मिळत नसून गेल्या महिनाभरापासून अनेक मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीची कामे बंद असल्याने त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. दुसरीकडे शेतकर्‍यांवरही आर्थिक भार वाढत असून ते दुहेरी संकटाचा सामना करत आहेत.

रानभाज्यांवरही परिणाम...
पाऊस लांबल्यामुळे जंगल परिसरात उगवणार्‍या रानभाज्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. रानभाज्या गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या अनेक कुटुंबांपुढेही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची चिंता वाढली आहे.

आभाळाकडे लागले डोळे...
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि रानभाज्या गोळा करणारे नागरिक सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. संपूर्ण जनजीवन आभाळाकडे डोळे लावून बसले असून, लवकरात लवकर दमदार पाऊस बरसावा आणि शेतीची चाके पुन्हा गतिमान व्हावीत, अशी प्रार्थना बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
...