अनिल कांबळे,
नागपूर,
fd-cyber-crime : सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या नव्या क्लृप्त्या समोर येत असून आता बँकेतील मुदत ठेव (एफडी) देखील त्यांच्या निशाण्यावर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांचा मोबाईल हॅक करीत त्यांची एफडी तोडून सायबर गुन्हेगार पैसे उडवित आहेत. नागपुरातील एका ज्येष्ठ नागरिकाची एफडी परस्पर तोडून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बँक खात्यांप्रमाणेच एफडीमधील पैसाही सुरक्षित नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांचे पैसे परस्पर लंपास करीत आहेत. पूर्वी बॅंकेतील केवळ बचत खात्यातील रक्कम उडविणारे सायबर गुन्हेगारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. बँक खाती सुरक्षित नसल्याचे दिसत असल्याने अनेक जण एफडी करुन पैसे गुंतवणूक करीत होते. आतापर्यंत सायबर गुन्हेगारांनी एफडी तोडून पैसे परस्पर लंपास केल्याच्या घटना समोर आल्या नव्हत्या. आता सायबर गुन्हेगारांची एफडी व अन्य गुंतवणुकीवर नजर गेली आहे. खातेधारकाच्या मोबाईल क्रमांक, ओटीपी, नेट बँकिंग आयडी अथवा रिमोट ॲक्सेस ॲपच्या मदतीने ते खात्यात प्रवेश मिळवून एफडी तोडण्याचे प्रकार घडत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. चितारओळीत राहणारे ज्येष्ठ नागरिक जयवंत आसरकर (७२) यांचे गांधीपुतळा चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे. त्यात त्यांनी भविष्याची ठेव म्हणून १३ लाख ५० हजार रुपयांची मुदतठेव (एफडी) केली होती. येत्या सप्टेंबर महिन्यांत एफडीची मॅच्युरिटी डेट होती. मात्र, मे महिन्यांत त्यांना बँकेतून तब्बल ६ लाख ५० हजार रुपये काढल्याचे ६ एसएमएस आले. जयवंत यांना आश्चर्य वाटले. त्यांनी लगेच बँक खात्याची चौकशी केली. सायबर गुन्हेगारांनी नेट बँकिंग सुविधेचा गैरवापर करत त्यांची एफडी तोडून ती सेव्हिंग अकाऊंटला ट्रान्सफर केली. त्यानंतर बँक खात्यातून थेट ६ लाख ५० हजार रुपये काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
बँकेतील डाटा बाहेर गेलाच कसा?
राष्ट्रीयकृत असलेल्या बँकेत कुणी किती रुपयांची एफडी केली आहे तसेच किती नागरिकांनी एफडी केली आहे, हा डाटा बँकेतून बाहेर गेलाच कसा. तसेच बँकेतील एफडी किंवा खात्याची माहिती सायबर गुन्हेगारांना देण्यासाठी बँकेतील अधिकारी-कर्मचारी जबाबदार आहे का? असा प्रश्न आसरकर यांनी केला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धपकाळातील आधार असलेला पैसा बँकेशी संबंधित कुणाच्यातरी चुकीमुळे सायबर गुन्हेगारांच्या घशात जात असेल तर कसून चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी पीडित जयवंत आसरकर यांनी केली आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
ओटीपी, सीव्हीव्ही, नेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. मोबाईलमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करू नये. बँकेच्या नावाने येणाऱ्या कॉल्सची खात्री करावी. खात्यातील व्यवहारांची नियमित तपासणी करावी. संशयास्पद व्यवहार दिसताच तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
सायबर गुन्हेगारांच्या बदलत्या पद्धतींमुळे आता केवळ बचत खातेच नव्हे तर मुदत ठेवीत जमा असलेली आयुष्यभराची बचतही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. बँक खात्यातील रक्कम लंपास झाल्यास बँक आणि सायबर पोलिसांना त्वरित माहिती द्यावी.
डॉ. अर्जून माने (सायबर एक्स्पर्ट, नागपूर)