बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

*आरोपीला पूण्यातून अटक *सायबर पोलिस ठाण्याची कामगिरी

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
fraudulent-loan-sanction : फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून एका यंत्र विक्रेत्याची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्‍या आरोपीला पोलिसांनी पुणे येथून अटक केली. विनोद शांताराम पाटील (44, रा. पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 
 
 
chand
 
 
 
येथील बाबूपेठ परिसरातील तक्रारदार हे हार्वेस्टर यंत्र विक्रेते आहेत. त्यांच्या एका ग्राहकामार्फत त्यांचा हेमंत जोशी नामक व्यक्तीशी संपर्क आला. ज्याने स्वतःला पुनावाला फिनकॉर्प लि. नागपूरचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तक्रारदारांच्या अन्य ग्राहकांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी या बनावट प्रतिनिधी हेमंत जोशी याच्याशी संपर्क साधला. हेमंत जोशी याने दोन ग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या सोबत कर्जाचे खोटे एग्रीमेंट केले. त्यानंतर, तक्रारदाराच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट ‘कर्ज मंजुरी पत्र’ पाठवून 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे भासवले. कर्जाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून 4 लाख 46 हजार 250 रुपये ‘वृषभ ईखार, जनरल मॅनेजर, पुनावाला फिनकॉर्प लि.’ या नावाच्या एका बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. एका पिडीत ग्राहकांकडुन रोख रक्कम घेऊन तक्रारदारांनी 16 मे 2026 रोजी आपल्या भ्रमणध्वनीमधील बँकेच्या अ‍ॅपद्वारे ही रक्कम बनावट प्रतिनिधी वृषभ ईखार याच्या खात्यावर वर्ग केली.
 
 
रक्कम जमा झाल्यानंतर आरोपीने पिडीतांना 18 मे 2026 रोजी कर्ज वितरण व मशीन डिलिव्हरीचे खोटी मंजुरी पत्र व वाहन डिलीवरी मेल पाठविले. मात्र, 19 मे 2026 पासून आरोपीचा भ्रमणध्वनी क्रमांक बंद येऊ लागला. संशय आल्याने तक्रारदाराने पुनावाला फिनकॉर्प लि. नागपूरच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, हेमंत जोशी नावाचा कोणताही कर्मचारी तेथे कार्यरत नसल्याचे आणि सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर हेल्पलाईन 1930 वर ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी 3 जून 2026 रोजी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
 
या गुन्हयाचा तपास सायबर पोलिस ठाण्याकडे दिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाअंती गुन्हयातील आरोपी विनोद पाटील याचा शोध घेवून त्याच्या पुणे येथील राहत्या घरातून अटक केली. आरोपी विनोद पाटील याने नाशीक (महाराष्ट्र), लखनऊ (उत्तरप्रदेश), इंदोर (मध्यप्रदेश), वडोदरा (गुजरात) या ठिकाणी सुध्दा आपले वेळोवेळी नाव बदलून लोकांची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसून आले आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनवाली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस करीत आहे.