तिसऱ्या वनडेपूर्वी हार्दिक आऊट हर्षित इन!

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Hardik out, Harshit in भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मालिका आधीच आपल्या नावावर केलेल्या टीम इंडियाने अंतिम सामन्याआधी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत मालिका २-० ने खिशात घातली आहे. आता अंतिम सामन्यातही विजय मिळवत मालिका क्लीन स्वीप करण्याचा संघाचा प्रयत्न असेल. अशातच बीसीसीआयने संघात बदल करत हर्षित राणाला संधी दिली आहे.
 
 
 
rana
दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर असलेल्या हर्षित राणाने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली असून तो आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे समोर आले आहे. त्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून तो चेन्नईमध्ये भारतीय संघासोबत दाखल झाला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याबाबत मात्र चिंताजनक बातमी समोर आली आहे.
सुरुवातीला त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पूर्ण तंदुरुस्तीनंतरच त्याला खेळवले जाणार होते. त्याची जुनी दुखापत पुन्हा बळावल्याने त्याचे नाव संघातून वगळण्यात आले आहे. यामुळे आगामी इंग्लंड मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २० जून रोजी होणारा तिसरा सामना भारतीय संघासाठी प्रयोग आणि तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. काही युवा खेळाडूंना संधी देत संघ व्यवस्थापन आगामी मालिकांसाठी योग्य संयोजन शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. हर्षित राणाच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी विभागाला नवी धार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.