नागपूर
Indian Forest Service भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्यांचे राज्य शासनाने आदेश जारी करत वन विभागात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. या आदेशानुसार नागपूरसह राज्यातील २८ आयएफएस अधिकाऱ्यांच्या विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (दुय्यम संवर्ग) ऋषिकेश रंजन यांची महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनौपज) नरेश झुरमुरे यांना पदोन्नती देत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनौपज) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) पी. कल्याणकुमार यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण), नागपूर येथे बदली करण्यात आली असून, पुण्यात कार्यरत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डब्ल्यू, आय. याटबोन यांची महा-कॅम्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला एन. यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांची एफडीसीएम नागपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. किशोर मानकर यांची मुख्य वनसंरक्षक (भूमी अभिलेख), नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अलिबागचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहुल पाटील यांना उपवनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन), वन्यजीव, नागपूर आणि विनोद शिवकुमार यांना उपवनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विदर्भातील इतर बदल्यांमध्ये एम. आदर्श रेड्डी यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून यवतमाळचे वनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून बदली करण्यात आली. तसेच अमितकुमार मिश्रा यांची कार्य आयोजन, नागपूर येथून पुसद येथे बदली झाली आहे, तर नितीनकुमार सिंग यांची नागपूर येथून यवतमाळला उपवनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजय माने यांची उपवनसंरक्षक (कार्य आयोजन), चंद्रपूर येथे नियुक्ती करण्यात आली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदराचे उपवनसंरक्षक कीर्ती दादासाहेब जमदाडे यांची उपवनसंरक्षक, अमरावती येथे, तर बल्लारशाहचे उपवनसंरक्षक विशाल माळी यांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे.
वरिष्ठांकडे अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी
काही पदे रिक्त राहिल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. यामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), नागपूर पदाचा अतिरिक्त कार्यभार एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (दुय्यम संवर्ग), नागपूर पदाचा अतिरिक्त कार्यभार जी. गुरुप्रसाद, वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर यांच्याकडे देण्यात आला आहे.