संयुक्त राष्ट्र,
India's Bimal Patel in United Nations भारतासाठी अभिमानाची बाब ठरवत प्रख्यात कायदेतज्ज्ञ बिमल पटेल यांची संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. ते येत्या १ ऑक्टोबरपासून आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कायदेशीर आणि राजनैतिक उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे. बिमल पटेल हे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा, सागरी हक्क आणि राज्यांच्या जबाबदारीसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण समित्यांमध्ये त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे त्यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय तसेच पंतप्रधान कार्यालयातही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच ते राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे कुलगुरू आणि सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरण हे जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचे न्यायसंस्था आहे, जे महासागरांचा वापर, समुद्री संसाधने आणि संबंधित कायदेशीर विवादांवर निर्णय देते. या न्यायाधिकरणातील भारताचे प्रतिनिधित्व वाढणे ही देशासाठी महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
या निवडीबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अभिनंदन केले असून भारताच्या बहुपक्षीय सहकार्य आणि सागरी कायद्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचे हे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशननेही या निवडीचे स्वागत करत सदस्य देशांचे आभार मानले आहेत. दीर्घकाळ चाललेल्या कारकिर्दीत बिमल पटेल यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या अनुभवाचा लाभ आता जागतिक स्तरावर मिळणार आहे.