गुजरात,
LNG shipment arrives in Gujarat इराण युद्धानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील नैसर्गिक वायूच्या वाढत्या मागणी आणि पुरवठ्यातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर ‘दिशा’ हा एलएनजी टँकर सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी पार करून गुजरातमधील दाहेज बंदरात दाखल झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत गॅस पुरवठ्याला मोठा आधार मिळणार असल्याचे मानले जात आहे.माल्टा ध्वज असलेल्या या एलएनजी टँकरमध्ये सुमारे ६२,३७० मेट्रिक टन द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) आहे. विशेष म्हणजे, इराण युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारतात पोहोचणारा हा पहिलाच एलएनजी टँकर ठरला आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

भरूच बंदर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘दिशा’ हे जहाज सकाळी दाहेज बंदरात पोहोचले असून ते पेट्रोनेट एलएनजीच्या जेट्टीवर नांगरण्यात आले आहे. या जहाजाचे व्यवस्थापन शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडने ते भाड्याने घेतले आहे.भारताच्या नैसर्गिक वायू गरजांचा मोठा हिस्सा एलएनजी आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः कतारसह आखाती देशांकडून येणारा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गेच भारतात पोहोचतो. त्यामुळे या मार्गावरील कोणताही तणाव भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी गंभीर ठरू शकतो. दरम्यान, अमेरिका-इराण संघर्षामुळे काही महिन्यांपासून या सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाला होता. मात्र अलीकडे दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानंतर जहाज वाहतुकीसाठी मर्यादित स्वरूपात मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर ‘दिशा’ या जहाजाने यशस्वीरित्या प्रवास पूर्ण करत भारत गाठल्याने ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.