४०० फूट दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
लोणावळा
Lohagad Fort accident अवघ्या काही दिवसांवर लग्नाची तारीख असताना होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Lohagad Fort accident,
 
 
मृत तरुणाचे नाव केतन अग्रवाल असे असून तो पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. काही दिवसांतच केतनचा विवाह उदयपूर येथे मोठ्या थाटामाटात होणार होता. विवाहसोहळ्यासाठी आलिशान विला बुक करण्यात आले होते. पाहुण्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त असतानाच या दुर्घटनेने आनंदाच्या वातावरणावर दुःखाची छाया पसरली.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केतनने गुरुवारी सकाळी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याचा बेत आखला होता. दोघेही किल्ल्यावर पोहोचल्यानंतर परिसरातील विविध ठिकाणी फिरत होते. निसर्गरम्य वातावरणात फोटो आणि व्हिडीओ काढत वाढदिवसाचा आनंद साजरा केला जात होता. याच दरम्यान किल्ल्यावरील एका कड्याजवळ फोटो काढताना केतनचा अचानक तोल गेला. पावसामुळे निसरडा झालेल्या पृष्ठभागावरून तो सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळला.
घटना घडताच सोबत Lohagad Fort accident असलेल्या तरुणीने आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. परिसरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. यानंतर लोणावळा पोलिसांना, मावळ वन्यजीव पथकाला तसेच शिवदुर्ग मित्र आपत्कालीन बचाव पथकाला माहिती देण्यात आली.बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. घनदाट झाडी, अवघड भौगोलिक परिस्थिती आणि खोल दरीमुळे बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले होते. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केतनला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.या दुर्घटनेमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरात काही दिवसांनी लग्नसोहळ्याची लगबग आणि मंगलधून ऐकू येणार होती, त्या घरात आता शोककळा पसरली आहे. आई-वडिलांचा लाडका मुलगा, बहिणीचा आधार आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या उंबरठ्यावर असलेला केतन एका क्षणात सर्वांना कायमचा सोडून गेला.दरम्यान, या प्रकरणाची नोंद लोणावळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पावसाळ्यात किल्ले आणि डोंगराळ भागात भटकंती करताना पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.