पोस्टमध्ये फक्त बाळासाहेब...बंडखोर खासदारांचा मास्टरस्ट्रोक!

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Masterstroke by the rebel Sena MPs शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता ते नेमके कोणत्या गटासोबत जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिल्याची चर्चा असून, काल झालेल्या पक्ष बैठकीलाही त्यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे उद्धव गटातील अस्वस्थता अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, बंडखोर खासदार अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नसल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
 
 
jadhav
 
वर्धापन दिनानिमित्त या खासदारांनी सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पोस्ट केले. मात्र या पोस्टनेच नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. पोस्टमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो वापरण्यात आला असून, ना उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसला. यामुळे खासदारांची पुढील राजकीय दिशा काय असणार, याबाबतचा सस्पेन्स आणखी गडद झाला आहे. या बंडखोर गटाचे नेतृत्व संजय जाधव करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा गट स्वतंत्र भूमिका घेणार की थेट शिंदे गटात प्रवेश करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’चीही जोरदार चर्चा सुरू आहे.
 
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी २० जून रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील २४ तासांत या संपूर्ण राजकीय घडामोडींना मोठे वळण मिळू शकते. काहींच्या मते विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या खासदारांच्या पुढील निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते. सध्या मात्र बंडखोर खासदार मौन बाळगून आहेत. सोशल मीडिया पोस्टमधूनही त्यांनी कोणतीही स्पष्ट हिंट दिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सस्पेन्स आणखी काही काळ कायम राहण्याची चिन्हे आहेत.