हत्ये प्रकरणी दोघांना अटक
अमरावती,
Murder case माहुली जहागीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथील एका विटभट्टीवर काम करणार्या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले आहे. त्याची हत्या दोन सहकारी मजुरांनीच केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
राज संजय अखंडे (२६, रा. धामणगाव गढी, ता. अचलपूर, ह.मु. माळेगाव विटभट्टी) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष बाबाराव इंगळे (३७) व प्रफुल वामनराव खाटसरे (४२, दोघेही रा. गुरुदेव नगर, मोझरी, ता. तिवसा) यांना अटक करण्यात आली आहे. राज अखंडे, संतोष इंगळे आणि प्रफुल खाटसरे हे तिघेही माळेगाव परिसरातील एका विटभट्टीवर काम करत होते. संतोष हा ट्रॅक्टर चालक तर राज आणि प्रफुल हे मजूर म्हणून कार्यरत होते. विटभट्टीचे मालक नजीर शहा आहेत. विटांची रक्कम दारुसाठी खर्च केल्याचे राजने नझीर शहा यांना सांगितले म्हणून त्याच रागातून संतोषने प्रफुलच्या मदतीने राजचा खुन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, १४ जूनच्या रात्रीपासून राजचा मोबाईल बंद येत असल्याने त्याचा भाऊ रोशन अखंडे याला संशय आला. १५ जून रोजी तो माळेगाव येथील विटभट्टीवर गेला असता राजचा मृतदेह परिसरात आढळून आला. त्याने तातडीने माहुली जहागीर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान संशय बळावल्याने रोशन अखंडे यांच्या तक्रारीवरून १८ जून रोजी संतोष इंगळे व प्रफुल खाटसरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.