विधी शर्मा
नागपूर,
Nagpur traffic congestion एकेकाळी रुंद रस्ते आणि सुरळीत वाहतुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराचा श्वास आज वाढत्या वाहतूक कोंडीमुळे गुदमरू लागला आहे. शहरातील प्रमुख मार्गांपासून ते अंतर्गत रस्त्यांपर्यंत बेकायदेशीर पार्किंगने अक्षरशः अतिक्रमण केले असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगांनी रस्त्यांचा मोठा भाग गिळंकृत केला आहे.
वाढती वाहनसंख्या, पार्किंगसाठी अपुरी जागा, नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे नागपूरकरांना दररोज कोंडीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून रस्ते नागरिकांपेक्षा वाहनांचेच अधिक झाले असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे.धंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी, धरमपेठ, काँग्रेसनगर, पंचशील चौक, बेसा, मनीषनगर आणि नरेंद्रनगरसारख्या भागांमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. परिणामी अनेक चारपदरी रस्ते प्रत्यक्षात दोनपदरी बनले असून वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे.
- वाहनांची झपाट्याने वाढ
मेट्रो, मिहान, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि नव्या निवासी वसाहतींमुळे शहराचा विस्तार वेगाने झाला. मात्र पार्किंगसाठी आवश्यक सुविधा त्याच प्रमाणात विकसित झाल्या नाहीत. मध्यमवर्गीय कुटुंबांकडे एकापेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकी असणे सामान्य झाले आहे. शहरात १६ लाखांहून अधिक वाहने नोंदणीकृत असताना पार्किंग व्यवस्थेची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे.
- खाजगी वाहनांसाठी नियमांचा अभाव
विशेष म्हणजे व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीसाठी पार्किंग जागेचा पुरावा सादर करणे बंधनकारक असताना खाजगी वाहनांसाठी अशी कोणतीही अट नाही. त्यामुळे वाहन कोठे उभे करायचे याचा विचार न करता वाहन खरेदी केली जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वाहन नोंदणीपूर्वी पार्किंग प्रमाणपत्र अनिवार्य केल्यास रस्त्यावरील पार्किंग कमी होण्यास मदत होईल, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विकास नियंत्रण नियमांनुसार निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागांवर दुकाने, कार्यालये आणि गोदामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरच वाहने उभी करावी लागत आहेत.
- न्यायालयाची तीव्र नाराजी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेकायदेशीर पार्किंग, अतिक्रमणे आणि सार्वजनिक रस्त्यांच्या गैरवापराबाबत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्पष्ट नियम असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
- नागरिकांच्या अडचणी वाढल्या
संध्याकाळी त्यांच्या परिसरातील रस्त्यांचे रूपांतर पार्किंग लॉटमध्ये होते. आपत्कालीन वेळी रुग्णवाहिकांना देखील मार्ग काढणे कठीण जाते. दुसरीकडे, पार्किंगसाठी स्वतंत्र जागेचे भाडे देखील परवडत नाही. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर वाहन उभी करण्यास मजबूर असतात.
- राजेश वानखेडे, मनीषनगर रहिवासी
- दीर्घकालीन उपायांची गरज
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, केवळ दंडात्मक कारवाईने प्रश्न सुटणार नाही. बहुमजली पार्किंग प्रकल्प, पार्किंग ऑडिट, इमारतींच्या पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी, सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि खाजगी वाहनांच्या नोंदणीसाठी पार्किंग प्रमाणपत्राची अट यांसारखे उपाय तातडीने राबविणे आवश्यक आहे. अन्यथा नागपूरलाही मुंबई, पुणे आणि बेंगळुरूसारख्या महानगरांप्रमाणे वाहतूक आणि पार्किंगच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो.