नागपूर,
Dhanwate National College Nagpur "संशोधन हे केवळ पदवी संपादनाचे साधन नसून समाजातील समस्यांवर उत्तर शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे. संशोधकांनी नाविन्यपूर्ण, समाजोपयोगी आणि परिणामकारक संशोधनाला प्राधान्य देत ज्ञाननिर्मितीत मोलाचे योगदान द्यावे," असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांनी केले.
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी आयोजित १० दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पीएम-उषा ३.० अंतर्गत आयोजित या अभ्यासक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्लेस फॉर हायर लर्निंग अँड रिसर्च (पीएचएलआर), आयक्यूएसी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे यांनी आंतरविद्याशाखीय संशोधनाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत समकालीन सामाजिक प्रश्नांवर प्रभावी संशोधनाची गरज व्यक्त केली. प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी महाविद्यालयाची संशोधन संस्कृती अधिक सक्षम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली, तर डॉ. के. डी. मेघे यांनी गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी संशोधन पद्धतीशास्त्राचे महत्त्व स्पष्ट केले.
या अभ्यासक्रमासाठी विविध शाखांतील ६२ संशोधकांनी नोंदणी केली आहे. संशोधन आराखडा, संशोधन पद्धती, संशोधन नैतिकता, माहिती विश्लेषण, शैक्षणिक लेखन, कृत्रिम बुद्धिमत्ता, एसपीएसएस व आर सॉफ्टवेअर, संदर्भ व्यवस्थापन आणि संशोधन प्रकाशन अशा विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.उद्घाटनानंतर झालेल्या शैक्षणिक सत्रांमध्ये डॉ. श्यामल रुईकर यांनी संशोधनाचा आढावा, डॉ. अनुप सुचक यांनी संशोधन विषय निवड व शीर्षक निर्मिती, तर डॉ. आशीष लिंगे यांनी उद्दिष्टे आणि गृहितक मांडणी या विषयांवर मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाचा समारोप ३० जून रोजी अंतिम परीक्षा आणि समारोप सत्राने होणार आहे.