रांजणी,
Pune water shortage राज्यात यंदा मान्सूनला झालेल्या विलंबामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून पुणे विभागासह अनेक भागांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे विभागातील धरणांमध्ये सध्या केवळ 14.30 टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत हा साठा 31.16 टक्के इतका होता.
मान्सूनचे आगमन लांबल्याने आणि यंदा वळीव पावसानेही दडी मारल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील 3028 धरणे व बंधाऱ्यांमध्ये गुरुवारअखेर एकूण जिवंत पाणीसाठा 24.3 टक्के इतका नोंदविण्यात आला असून, गेल्या वर्षी 18 जून रोजी हा आकडा 32.38 टक्के होता.
जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मते, केवळ आकडेवारीच्या तुलनेत परिस्थिती समजून घेणे पुरेसे नसते, कारण मान्सूनचे आगमन आणि पावसाचे वितरण यामध्ये मोठा फरक पडतो. मागील वर्षी मान्सून 28 मे रोजीच सक्रिय झाल्याने जूनच्या मध्यापर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र मान्सून अद्याप पूर्णतः सक्रिय न झाल्याने पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले.पाणीसाठ्यातील घटामुळे ग्रामीण व शहरी भागांत पाणीटंचाई जाणवू लागली असून काही ठिकाणी पाणी कपातीचे उपायही सुरू करण्यात आले आहेत. पाण्याची बचत करण्यावर भर देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहूनच पेरणी करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.
दरम्यान, ‘मृत पाणीसाठा’ ही संकल्पना Pune water shortage देखील पुन्हा चर्चेत आली आहे. धरणांमध्ये तळाशी असलेला पाण्याचा भाग हा सामान्यतः वापरात आणला जात नाही, यालाच मृत साठा म्हटले जाते. या पातळीवरील पाण्याच्या वर असलेला उपयोगी साठा ‘जिवंत पाणीसाठा’ म्हणून गणला जातो. सध्या पुणे विभागात सुमारे 77.2 अब्ज घनफूट जिवंत पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील परिस्थितीही चिंताजनक असून डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज आणि पिंपळगाव जोगा या पाच प्रमुख धरणांतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. पुढील काही दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यातील जलसाठ्यांवर मोठा ताण निर्माण झाला असून येत्या काळात काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि बचत उपायांवर भर देणे अत्यावश्यक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.