मुंबई
Rajabhau Waje शिवसेनेतील (ठाकरे गट) अंतर्गत राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षाच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चेमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र असतानाच, या घडामोडींना वेगळी दिशा देणारी घटना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षाशी कायम राहण्याचा घेतलेला ठाम निर्णय ठरला आहे. मोठ्या आर्थिक आणि विकासकामांच्या ऑफर झुगारून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाशी निष्ठा कायम ठेवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने चर्चेत असलेल्या घडामोडींमुळे ठाकरे गटातील खासदारांमध्ये फूट पडल्याचे बोलले जात आहे. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाची संसदीय ताकद कमी झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीत संजय राऊत, तसेच अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते, तर बंडखोर खासदार अनुपस्थित राहिल्याने फूट अधिक स्पष्ट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ठाम भूमिका
या साऱ्या घडामोडींमध्ये लक्षवेधी ठरले ते राजाभाऊ वाजे यांचे ठाम भूमिकेचे प्रदर्शन. कोट्यवधी रुपयांच्या आणि मतदारसंघातील मोठ्या विकासकामांच्या ऑफर मिळाल्या तरीही त्यांनी त्या अमिषांना न जुमानता ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या निर्णयामागे पक्षाच्या विचारधारेवरील निष्ठा आणि वैयक्तिक ठाम भूमिका कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर वाजे नाशिकमध्ये परतल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक रेल्वे स्थानकावर ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि औक्षण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. “राजाभाऊ वाजे यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.नाशिकमध्ये परतल्यानंतर वाजे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपण निवडून येण्यामागे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि विचारधारेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. “ज्या विचारधारेमुळे मी निवडून आलो, त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. मी शेवटपर्यंत Rajabhau Waje उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार,” अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत समीकरणांवर मोठा परिणाम झाला असून आगामी काळात राज्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदारांच्या हालचाली आणि पक्षनिष्ठेच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.