* सीईआयआर पोर्टलची मदत : नवेगावबांध पोलिसांची कामगिरी
नवेगावबांध,
returned the mobile phone हरविलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा अनेकदा मावळलेली असते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्याच्या भूमिकेमुळे नवेगावबांध पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. भारत सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलच्या सहाय्याने तब्बल 1 लाख 15 हजार 448 रुपये किमतीचे 10 हरविलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात आले असून ते त्यांच्या मूळ धारकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
मोबाईलमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती, बँकिंग व्यवहार, कागदपत्रे आणि महत्त्वाचा डेटा साठवलेला असतो. त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. अशावेळी नवेगावबांध पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळाला असून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणांची गंभीर दखल घेत तांत्रिक तपासाला सुरुवात केली. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकांचा मागोवा घेत विविध ठिकाणी त्यांचे लोकेशन शोधण्यात आले. पोलिसांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक विश्लेषण आणि सायबर यंत्रणेच्या मदतीने हे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले. मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत देताना पोलिसांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मोबाईल धारकांच्या चेहर्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.