नागपूर,
RTMNU boot camp संशोधन संस्कृतीला चालना देत आधुनिक वैज्ञानिक कौशल्यांचा विकास घडविण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रथमच "फंक्शनल मटेरियल्स डिझाइन अँड स्ट्रक्चर–प्रॉपर्टी कॅरेक्टरायझेशन" या विषयावरील विशेष बूट कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. आधुनिक पदार्थविज्ञान आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञानातील प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारा हा उपक्रम विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या बूट कॅम्पमध्ये फंक्शनल मटेरियल्सचे डिझाइन, संश्लेषण, निर्मिती, वैशिष्ट्यीकरण आणि कार्यक्षमतेचे मूल्यमापन यासंदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मटेरियल्स सायन्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, नॅनोतंत्रज्ञान, ऊर्जा पदार्थ, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि संबंधित आंतरविद्याशाखीय क्षेत्रांतील विद्यार्थी व संशोधकांसाठी हा कार्यक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणादरम्यान मटेरियल्स सिंथेसिस, थिन फिल्म तंत्रज्ञान, नॅनोमटेरियल्स निर्मिती, एक्स-रे विवर्तन, क्रिस्टल संरचना विश्लेषण, विद्युत व डायइलेक्ट्रिक गुणधर्मांचे मापन, इम्पीडन्स स्पेक्ट्रोस्कोपी, वैज्ञानिक डेटा विश्लेषण, कर्व्ह फिटिंग, मटेरियल्स इन्फॉर्मेटिक्स तसेच संशोधन पद्धती, तांत्रिक अहवाल लेखन आणि वैज्ञानिक सादरीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण कौशल्यांवर भर दिला जाणार आहे.
हा कार्यक्रम पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. संशोधक, संशोधन फेलोज, प्राध्यापक तसेच विज्ञान व अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. पारंपरिक शिक्षण आणि प्रयोगाधारित संशोधन यांतील दरी कमी करून उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सेमीकंडक्टर, ऊर्जा तंत्रज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बूट कॅम्प उपयुक्त ठरणार आहे. प्रवेशसंख्या मर्यादित असून "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती समन्वयक तथा भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. स्मिता आचार्य यांनी दिली.