मुंबई
Second Love प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे आणि भावनिक गुंतवणूक निर्माण करणारे रिअॅलिटी शो देण्यासाठी ओळखली जाणारी बनिजय एशिया आता ‘सेकंड लव्ह’ हा नवा तमिळ रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या या शोची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, प्रेमभंग आणि अपयशी नात्यांचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींना प्रेमाची दुसरी संधी देण्याची अनोखी संकल्पना या कार्यक्रमातून मांडण्यात येणार आहे.
पारंपरिक डेटिंग किंवा रिअॅलिटी शोच्या चौकटीबाहेर जाऊन तयार करण्यात आलेल्या ‘सेकंड लव्ह’मध्ये 12 अविवाहित स्पर्धक सहभागी होणार आहेत. भूतकाळातील नात्यांमुळे भावनिक जखमा सोसलेल्या या स्पर्धकांचा प्रवास या शोमध्ये उलगडणार आहे. विविध उपक्रम, मनमोकळे संवाद आणि भावनिक अनुभवांच्या माध्यमातून हे स्पर्धक पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतील. या प्रवासाच्या अखेरीस ते आपल्या आयुष्यात प्रेमाला दुसरी संधी द्यायची की नाही, याचा निर्णय घेणार आहेत.
शोबाबतची उत्सुकता वाढवणारी Second Love आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रम्या कृष्णन यांची सूत्रसंचालक म्हणून निवड. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आणि दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या रम्या कृष्णन या स्पर्धकांना त्यांच्या भावनिक प्रवासात मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पोस्टरमध्ये त्या हातात पट्टी बांधलेले हृदय धरून उभ्या असल्याचे दिसते. पार्श्वभूमीत दिसणारी जोडपी आणि पोस्टरची संकल्पना शोच्या भावनिक आशयाला अधोरेखित करते.‘सेकंड लव्ह’ हा शो बनिजय एशियाच्या लोकप्रिय रिअॅलिटी कंटेंटच्या यादीतील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नवनवीन आणि नाविन्यपूर्ण फॉरमॅट्स सादर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या निर्मिती संस्थेच्या नव्या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत बनिजय Second Love एशिया आणि एंडेमोल शाइन इंडिया यांनी बनिजय एंटरटेनमेंटच्या अंतर्गत भारतीय मनोरंजन क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. स्क्रिप्टेड कंटेंटमध्ये ‘द नाईट मॅनेजर’, ‘द ट्रायल’, ‘होस्टेजेस’, ‘कॉल माय एजंट : बॉलिवूड’, ‘उंदेखी’, ‘आर्या’, ‘बॉम्बे बेगम्स’ आणि ‘ट्रायल बाय फायर’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या ‘हाऊस एम.डी.’च्या भारतीय रूपांतरावरही काम सुरू आहे.नॉन-स्क्रिप्टेड मनोरंजन क्षेत्रातही या संस्थेने अनेक यशस्वी कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘मास्टरशेफ इंडिया’, ‘एमटीव्ही रोडीज’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’, ‘द 50’ आणि ‘राईज अँड फॉल’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमुळे या संस्थेने भारतीय प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे.प्रेम, भावना आणि नव्या सुरुवातींची कहाणी मांडणारा ‘सेकंड लव्ह’ हा शो प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून प्रेमाला दुसरी संधी देणाऱ्या या अनोख्या प्रवासाकडे मनोरंजनविश्वाचे लक्ष लागले आहे.