आरोपी फरार, पोलिसांचा शोध
अमरावती,
Sexual assault on a girl एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फोनवरून धमकी देऊन बोलावून घेत, मित्राच्या खोलीवर नेले. त्या ठिकाणी तीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीविरुध्द शुक्रवारी बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचा शोध सुरू आहे.
जय कडू (रा. मेहेरबाबा कॉलनी, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जय कडू याने पीडित अल्पवयीन मुलीला फोन केला. फोनवरच त्याने मुलीला धमकी दिली आणि तिला बाहेर भेटायला बोलावले. आरोपीच्या धमकीमुळे प्रचंड घाबरलेली मुलगी त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर जय याने तिला जबरदस्तीने एका मित्राच्या रूमवर नेले. तिथे त्याने पीडितेला मारहाण केली आणि पुन्हा धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या भयानक प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड हादरून गेली होती. तिने कसाबसा घरचा रस्ता गाठला आणि घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला अत्याचार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मुलीला सोबत घेऊन फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फ्रेजरपुरा पोलिस जयचा शोध घेत आहे.