वॉशिंग्टन,
Shooting in Times Square अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क शहरातील गजबजलेल्या टाइम्स स्क्वेअर परिसरात अचानक गोळीबार झाल्याने काही क्षणांतच आनंदाचे वातावरण भीतीत बदलले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि हजारो लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना दिसले. घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उपस्थित होते. शहरात सुरू असलेल्या विजय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर गर्दीने फुलला होता. अचानक गोळीबाराचा आवाज येताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच आनंदोत्सवाचे रूपांतर गोंधळ आणि धावपळीत झाले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यात गोळीबारानंतर लोक घाबरून इकडे-तिकडे पळताना स्पष्ट दिसत आहेत. काही जण सुरक्षित ठिकाण शोधताना तर काही जण घाबरून रस्त्यांवरून धावताना दिसले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर ताब्यात घेतला. प्राथमिक माहितीनुसार, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृत तपास अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेतील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या कार्यक्रमांदरम्यान सुरक्षा व्यवस्था असूनही अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. अमेरिकेत वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे सुरक्षेबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.