पटकावला देशात तिसरा क्रमांक
दिग्रस,
SOS Karate Club वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2026 मध्ये दिग्रस येथील एसओएस कराटे क्लबच्या खेळाडूंनी आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या अत्यंत चुरशीच्या आणि भव्य राष्ट्रीय स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत थेट राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे.
स्पोर्ट्स शोतकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 13 व 14 जून रोजी देवळीच्या विदर्भकेसरी खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडियमवर या चौथ्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2026-27 चे आयोजन करण्यात आले होते. असोसिएशनचे अध्यक्ष सिहान मंगेश भोंगाडे यांच्या कुशल नेतृत्वात या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या तगड्या खेळाडूंशी दोन हात करत दिग्रसच्या चिमुरड्यांनी या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. एसओएस कराटे क्लबच्या एकूण 24 मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या सर्व खेळाडूंनी ‘काता’ आणि ‘कुमिते’ या दोन्ही प्रकारांत विविध वजन गटांत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. मुख्य प्रशिक्षक शेख सोनू यांच्या उत्कृष्ट आणि कठोर मार्गदर्शनात खेळाडूंनी हे यश खेचून आणले आहे.
एसओएसची एकूण 37 पदकांची कमाई
खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीने पदकांची अक्षरशः लूट केली. क्लबच्या खात्यात एकूण 37 पदके जमा झाली आहेत. त्यात 5 सुवर्ण, 11 रौप्य आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. या अभूतपूर्व यशामुळे सर्व पदक विजेत्या खेळाडूंनी आपले आई-वडील, प्रशिक्षक आणि दिग्रस तालुक्याचे नाव मोठे केले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून एसओएस कराटे क्लबचे खेळाडू आणि प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.