भारतीय संघाला धोनीसारखा मेंटॉर हवा!

गौतम गंभीरवर श्रीसंतचा निशाणा

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली.
Sreesanth takes aim at Gautam Gambhir भारतीय क्रिकेटमध्ये सध्या प्रशिक्षकपद आणि संघ निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर थेट निशाणा साधत खळबळजनक वक्तव्य केले आहे. संघाला सध्याच्या परिस्थितीत प्रशिक्षकापेक्षा मजबूत मार्गदर्शकाची गरज असून महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखी व्यक्ती संघासाठी अधिक योग्य ठरेल, असे श्रीसंतने म्हटले आहे.गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात भारतीय संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संघ नव्या दिशेने वाटचाल करत आहे. काही स्पर्धांमध्ये भारताने उल्लेखनीय यश मिळवले असले तरी घरच्या मैदानावर काही मालिकांतील निराशाजनक कामगिरीमुळे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 
 
Gambhir and dhoni
 
एका मुलाखतीत बोलताना श्रीसंतने खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य केले. खेळाडूंना आत्मविश्वास देणारी, त्यांचा आदर करणारी आणि दबावाच्या क्षणी त्यांच्या पाठीशी उभी राहणारी व्यक्ती संघासाठी महत्त्वाची असते, असे त्याने स्पष्ट केले. त्याच्या मते, संघाच्या यशामागे सर्वात मोठा वाटा खेळाडूंचाच असतो.श्रीसंतने यावेळी धोनीच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची क्षमता आणि दबावाखाली शांत राहण्याची वृत्ती हीच भारताच्या यशाची गुरुकिल्ली होती, असे तो म्हणाला.
 
धोनीसारखा मार्गदर्शक संघासोबत असल्यास खेळाडूंची मानसिक ताकद अधिक वाढेल, असेही त्याने नमूद केले. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवले असले तरी काही निर्णय आणि निवडींवरून सतत चर्चा सुरू आहे. श्रीसंतच्या या वक्तव्यामुळे आता क्रिकेट वर्तुळात नवी चर्चा रंगली असून प्रशिक्षकपद आणि संघाच्या भविष्यासंदर्भात वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.