माता रुख्मिणीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
टाळ-मृदंगात हरिनामाच्या अखंड जयघोष
 
तिवसा, 
sritirtha kshetra kandanyapur जिल्ह्यातील पवित्र श्रीतीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथून विदर्भातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या ४३२ व्या आषाढी पंढरपूर पायदळ पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानातून निघालेल्या या माता रुख्मिणीच्या पालखी सोहळ्याने परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण केले. सन १५९४ पासून अखंडपणे सुरू असलेली विदर्भ कन्या माऊलीची ही पायदळ वारी महाराष्ट्रातील पंढरपूरकडे जाणारी सर्वात प्राचीन आणि एकमेव ऐतिहासिक पालखी मानली जाते. शेकडो वारकरी, भाविक आणि विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत माऊलीच्या पालखीचे पूजन करण्यात आले आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
 
 
Kandanyapur
 
यामंगल सोहळ्यास आमदार राजेश वानखडे आणि त्यांच्या सहचारिणी आरती वानखडे यांनी सपत्नीक उपस्थित राहून माऊलीचे दर्शन घेतले. त्यांनी पालखीचे पूजन करून माऊलीची पालखी वाहण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली. भक्तिभावाने पालखी वाहताना त्यांनी वारकर्‍यांसोबत नामस्मरणात सहभाग घेतला. यावेळी प्रदीप गौरखेडे, छाया दंडाळे, निलेश श्रीखंडे, दिलीप मेहकरे, संजय चिंचे, संदीप सोटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी प्रस्थानावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात आणि विठ्ठलभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने कौंडण्यपुर ते पंढरपूर या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली.
कौंडण्यपुरची ४३२ वर्षांची अखंड परंपरा
सन १५९४ पासून सुरू असलेली कौंडण्यपुरची आषाढी पायदळ पालखी ही विदर्भाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जीवंत प्रतीक मानली जाते. चार शतकांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही वारी आजही हजारो भाविकांना भक्ती, समता आणि वारकरी संस्कृतीचा संदेश देत आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली ही पालखी विदर्भाच्या आध्यात्मिक वारशाचा अभिमान मानली जाते.