अफगाणिस्तानचा ‘ऑपरेशन बदला’ सुरू!

पाकिस्तानवर जोरदार कारवाई

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
इस्लामाबाद ,
Strong action against Pakistan अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अफगाणिस्तानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या भागांमध्ये ड्रोन हल्ले करत मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत दहशतवादी संघटनांशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अफगाण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई अशा ठिकाणांवर करण्यात आली जिथून अफगाणिस्तानविरोधात हल्ल्यांचे नियोजन आणि समन्वय केला जात होता. या भागांचा वापर दहशतवादी हालचालींसाठी ऑपरेशनल बेस म्हणून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
 
 
 
Pakistan
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील काही संवेदनशील भागांमध्ये हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये किल्ला अब्दुल्ला परिसर आणि चगाई जिल्ह्यातील काही जंगल भागांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तसेच खैबर पख्तुनख्वा भागातील काही ठिकाणांवरही हवाई कारवाई झाल्याचे संकेत आहेत.अफगाण संरक्षण मंत्रालयाने या कारवाईची पुष्टी करताना सांगितले की, दहशतवादी गट आयएसआयएस-खोरासानशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या ठिकाणांचा वापर हल्ल्यांचे नियोजन आणि प्रशिक्षणासाठी केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात तणाव वाढलेला दिसत आहे. सततच्या आरोप-प्रत्यारोपांनंतर आता थेट हवाई कारवाई झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.