अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करा, अन्यथा…

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
वडगाव मावळ,
Sunil Shelke मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी पंचायत समिती मावळ येथे शुक्रवारी सर्व विभागांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या
 

Sunil Shelke  
मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची प्रगती आणि नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग, महावितरण तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
 
 
बैठकीत बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी विकासकामांचा वेग वाढवताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विकासकामांच्या अंमलबजावणीत गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी अधिकाऱ्यांना केले.कायदा व सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांच्या प्रश्नावर आमदार सुनील शेळके यांनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. तालुक्यात मटका, जुगार, एमडी पावडरचा अवैध व्यापार, अवैध दारू विक्री किंवा इतर कोणतेही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीची तयारी ठेवावी, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.बैठकीत ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तसेच वीज बिलाच्या कारणामुळे खंडित झालेल्या पाणीपुरवठा योजनांना तत्काळ सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे आमदार शेळके यांनी नमूद केले.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता, शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत शैक्षणिक सुविधा सक्षम असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत निर्देश देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले. आमदार निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा राखून ती निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, अंगणवाडी इमारतींची कामे गतीने पूर्ण करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
प्रलंबित कामे, विकासकामांमधील अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर शासकीय यंत्रणेने अधिक वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच कृषी क्षेत्रातील नुकसानीबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना करण्यात आल्या.
तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे सांगत आमदार सुनील शेळके यांनी सर्व विभागांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.