तामसवाडा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवा

अ‍ॅड. हेलोंडे यांचा आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत संवाद

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Tamaswada pattern Wardha सावकरी कायद्याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. याबाबत तक्रारी असल्याल लेखी स्वरुपात सादर करण्यास प्रोत्साहित करावे. बी-बियाणे, शेती उपयोगी साहित्य वाटपाबाबत तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवड करण्यात याव्या यासोबतच सेलू तालुयात सिंचनासाठी फायदेशीर ठरलेला तामसवाडा पॅटर्न जिल्ह्यात राबवण्यात यावा अशा सुचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी केल्या.
 

Tamaswada pattern Wardha 
सेलू तालुयातील जंगलापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी गणेश माहुरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियाशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना सुचना केल्या. यावेळी तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, समाज कल्याणचे विजय कामडी, गट विकास अधिकारी देवानंद पाणबुडे, तालुका कृषी अधिकारी माहुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम वरठी, महिला व बाल विकासचे व्ही.जी. नागोसे, गट शिक्षणाधिकारी शैलेजा शिंदे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. डी साखरे, नायब तहसीलदार के. डी. किरसान, आदी उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. निलेश हेलोंडे-यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे वडील तुकाराम माहुरे यांच्याशी संवाद साधला. त्यांना मिळत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. सदर कुटूंबाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या तालुका प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर तहसील कार्यालय येथे तालुका विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शासनाच्या सर्व योजना प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. तामसवाडा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी बैठकीत दिल्या. दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दुधाळू जनावरे वाटपाबाबतच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत प्रत्यक्षपणे जाऊन त्यांना दुग्धव्यसायाबाबत मार्गदर्शन करावे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कौशल्य विकास कार्यक्रमातून कार्यकुशल बनविण्यावर भर द्यावा. महिला व बालविकास विभागामार्फत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना बालसंगोपन या आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या सुचना केल्या.
शेतकर्‍यांना शेती पुरक व्यवसायाच्या प्रशिक्षणाबाबत माहिती देऊन शेतीपूरक व्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबतचे काम प्रशासनाकडून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बँक ऑफ इंडियामार्फत राबविण्यात येणारा कौशल्य विकास कार्यक्रम शेतकरी कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहचवून त्यांना प्रशिक्षित करण्याचे धोरण राबविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.