मॉस्को
The thrill of black rain in Moscow रशियाची राजधानी मॉस्को येथे एका अनोख्या आणि धक्कादायक परिस्थितीचा अनुभव नागरिकांनी घेतला. एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर शहराच्या काही भागांमध्ये आकाशातून काळ्या रंगाचा तेलकट थर पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनकडून करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील ड्रोन हल्ल्यानंतर मॉस्को परिसरात मोठ्या प्रमाणावर स्फोट आणि आगीच्या घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर हवेत धुराचे दाट ढग पसरले आणि काही भागांमध्ये काळ्या तेलकट कणांचा वर्षाव झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.या घटनेनंतर शहरातील रस्ते, वाहनं आणि इमारतींच्या पृष्ठभागावर काळा चिकट थर साचल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेकांनी या काळ्या द्रवाला स्पर्श केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून, त्यामुळे आरोग्यविषयक धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मॉस्को प्रशासनाने सुरुवातीला या प्रकाराला नकार दिला आणि “काळा पाऊस” किंवा तेलाचा वर्षाव झाल्याचा दावा फेटाळून लावला. मात्र, त्यानंतर अधिकृत यंत्रणांकडून नागरिकांसाठी सावधगिरीचे आदेश जारी करण्यात आले. काही भागांतील नागरिकांना घरातच राहण्याचा आणि खिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणांनी विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलण्याचे आवाहन केले आहे. हवेत पसरलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, रशियन संरक्षण मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखल्याचा दावा केला आहे. मात्र या घटनेनंतर मॉस्कोतील परिस्थितीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.