वेध
uddhav thackeray राजकारण हा असा खेळ आहे की इथे माणसाची झोप उडवते. निवडणुका जिंकल्या तरीही झोप उडते आणि हरल्या तरीही! सत्ता मिळाली तर टिकवायची चिंता, गेली तर परत मिळवायची चिंता. पक्ष मोठा झाला तर आमदार-खासदार सांभाळण्याची कसरत, पक्ष फुटण्याची वेळ आली तर कार्यकर्ते टिकवण्याची धडपड. एकंदरीत राजकारणात सुखी माणूस शोधायला निघालात तर तो सापडणे जवळजवळ अश्यकच! पण, राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत एक व्यक्ती अशी आहे, त्यांच्याकडे पाहून वाटतं की हा माणूस निवांत आहे. तो म्हणजे राज ठाकरे! आज महाराष्ट्रात रात्री कोण कुठल्या पक्षात गेला, कोणत्या आमदाराने नाराजी व्यक्त केली, कोणत्या खासदाराने दिल्ली गाठली याचा अंदाज घ्यावा लागतो. अशा वातावरणात राज ठाकरे मात्र वेगळ्याच विश्वात वावरतात. त्यांना ना खासदार फुटायची चिंता, ना आमदार फुटायची भीती! त्यामुळे या बाबतीत त्यांच्यावर कोणताही मानसिक ताण नाही. काही गमावण्याचे भय नाही! या गोष्टी आजच आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या चार दिवसांपासुन हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजिव, विद्यमान उबाठा प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उरले सुरले खासदारही शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याचा वारा वाहू लागला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची झोप निश्चित उडालीच असेलही.
पण, हवा भरायला राऊत असल्याने उद्धव ठाकरे सकाळपर्यंत थोडे निवांत असतील. पण, खासदार गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले असणार. तो अवस्थपणा राज ठाकरेंना नाही! ते तसेही बोलायला अघळपघळ आणि रोख ठोक आहेत. त्यांना ‘टायमिंग’ साधता येतं. मुळात ते त्यांचा निर्णय स्वत: घेतात. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका निवडणुकांचा सुगंध दरवळताच ते बाहेर निघातात. त्यांना पटेल ते बोलतात, स्वत:ची भुमिका वेळप्रसंगी बदलत ठेवतात. पण, त्या बदलत्या भुमिकेवरही ते त्यावेळी ठाम असतात. त्यामुळे त्यांना गमावण्याची चिंता नसते. त्यांची राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट कायम तयार असते. स्वत:चं महत्त्व कायम ठेवण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. त्यामुळे राजकारणातील बड्या नेत्यांमध्ये त्यांच नाव असलं तरी ते आज निवांत आहेत. त्यांचं कोणी फुटलं असा डाग त्यांना लागला नाही. राजकारणात कोणाला समजावून सांगायचं, कोणाला मंत्रिपदाचं आश्वासन द्यायचं, कोणाची नाराजी दूर करायची असते. पण, राज ठाकरे यांना ते करावेच लागत नाही. राज ठाकरे यांचे सध्या एक बरं आहे. भाषण करा, व्यंगचित्र काढा, एखादा दौरा करा, सत्तासाधार्यांना (न मागता) मार्गदर्शन करत राज्याच्या प्रश्नांवर बोला आणि निवांत व्हा. सकाळी जो नेता एका पक्षात होता तो सायंकाळी दुसर्या पक्षात दिसतो. पण, या सगळ्या गोंधळात राज ठाकरे यांची भूमिका प्रेक्षकासारखी आहे. याचा अर्थ ते ‘राजकारण’ करत नाहीत असा नाही. उलट महाराष्ट्रात त्यांच्या भाषणचे प्रेमी आहेत.
पण, सत्तेच्या गणितांमध्ये अडकून पडलेल्या इतर नेत्यांच्या तुलनेत ते अधिक निवांत दिसतात, हीच खरी गंमत आहे. अनेकदा कमी जबाबदार्या म्हणजे जास्त मानसिक शांतता असं समीकरण तयार होतं. खरं तर राजकारणात सुखी कोण, हा प्रश्नच मजेशीर आहे. मुख्यमंत्री सुखी नसतो, कारण त्याला राज्याची चिंता असते, पक्ष सांभाळावा लागतो. सत्तेतील सहकारी पक्षांनाही समजून घ्यावे लागते. विरोधी पक्षनेता सुखी नसतो, कारण त्याला सत्तेत जायची घाई असते. मंत्र्याला स्वत:चं खातं टिकवायचं असतं. आमदाराला पुढच्या निवडणुकीची चिंता असते. कार्यकत्र्यांना पदं हवं असतात. अशा वेळी विद्यमान परिस्थितीत सगळ्यात सुखी कोण? या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे! यामध्ये आणखी एक गंमत आहे. राज ठाकरे यांची प्रतिमा ही केवळ राजकारण्याची नाही. ते उत्तम वक्ते आहेत, चित्रकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत, सिनेमा आणि संगीत यांचे जाणकार आहेत. त्यामुळे राजकारणाच्या बाहेरही त्यांच्याकडे रस घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. बहुतांश नेत्यांचं आयुष्यफक्त राजकारणाभोवती फिरतं. पण, राज ठाकरे यांचं तसं नाही. ते स्वतःला व्यस्त ठेवू शकतात. अर्थात प्रत्यक्षात कोणत्याही राजकीय नेत्याचं आयुष्य इतकं सोपं नसतं. प्रत्येकाला काही ना काही चिंता असतेच. ती चिंता राज ठाकरे यांना असायलाच हवी आणि असेलही! तरीही ते सध्या निवांत आहेत. एकेकाळी विचारधारा हा पक्षांचा पाया मानला जायचा. आज आकडेमोड आणि सत्तासमीकरणं महत्त्वाची ठरतात. त्यामुळे कोण कुणासोबत जाईल? हा प्रश्न कायम असतो. या पृष्ठभूमीवर राजकारणात ज्यांच्याकडे फुटण्यासारखं काही नाही तोच सुखी असेच म्हणावे लागेल. त्यात राज ठाकरे तंतोतंत बसतात. लोकशाहीत नेत्यांवर टीका होते अन् कौतुक होतं, व्यंगचित्रं काढली जातात, मीम्स तयार होतात. हे सगळं लोकशाहीचं सौंदर्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. महाराष्ट्रात सगळेच कोणत्या ना कोणत्या चिंतेत आहेत. पण, राज ठाकरे निवांत आहेत. कारण, त्यांना ना खासदार फुटायची भीती, ना आमदार फुटायची चिंता. एक मात्र खरं की त्यांच्याकडे ‘सय्यम’ आहे म्हणून ते सदा सुखी आहेत! रामायणात बिभीषण आणि कैकयी दोन व्यक्ती होत्या! बिभीषण रावणाच्या राज्यात होता तरीही तो बिघडला नाही. कैकयी रामाच्या राज्यात होती तरीही छळ आणि कपटी होती. त्यामुळे तुम्ही कुठे राहता याचा फरक पडत नाही. बिभीषण सय्यमी होता. तुम्ही सय्यमी आहात हे महत्त्वाचं असतं. राज ठाकरेंकडे सय्यम आहे म्हणून ते सुखी
आहेत.
प्रफुल्ल व्यास
९८८१९०३७६५