मॉस्कोवर युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मॉस्को,
Ukraine's drone attack on Moscow रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. युक्रेनने थेट रशियाची राजधानी मॉस्कोला लक्ष्य करत आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. एकाच वेळी २०० हून अधिक ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण मॉस्को हादरले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.या भीषण हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर मॉस्कोतील अनेक भागांत आग लागल्याचे वृत्त आहे. विशेषतः तेल शुद्धीकरण केंद्रांना मोठा फटका बसला असून काही ठिकाणी मोठ्या आगीने परिस्थिती अधिक गंभीर बनली. सुरक्षेच्या कारणास्तव मॉस्कोतील प्रमुख विमानतळांवरील उड्डाणेही काही काळासाठी स्थगित करण्यात आली.
 

attack on Moscow 
 
दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बहुतांश ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, मॉस्कोकडे येणाऱ्या शेकडो ड्रोनपैकी मोठा हिस्सा अडवण्यात आला. मात्र, काही ड्रोन संरक्षण कवच भेदून राजधानीत पोहोचल्याने रशियाच्या अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः रशियाची अत्यंत शक्तिशाली मानली जाणारी एस-४०० ट्रायम्फ हवाईसंरक्षण प्रणाली या हल्ल्यापुढे प्रभावी ठरली नाही, अशी चर्चा रंगली आहे. तज्ज्ञांच्या मते, युक्रेनने या हल्ल्यात अत्यंत योजनाबद्ध रणनीतीचा वापर केला. कमी उंचीवरून उड्डाण करणारे ड्रोन रडारच्या नजरेत सहज येत नाहीत. इमारती, भूभाग आणि नैसर्गिक अडथळ्यांचा वापर करून हे ड्रोन लक्ष्याच्या जवळ पोहोचले.
 
याशिवाय, शेकडो ड्रोन एकाच वेळी पाठवून संरक्षण यंत्रणेवर ताण आणण्याची रणनीती वापरण्यात आली. यामुळे रडार आणि संगणकीय यंत्रणा काही काळ गोंधळात पडल्याचे मानले जात आहे. खरे आणि बनावट ड्रोन एकत्र वापरल्याने नेमका धोका ओळखणे रशियासाठी कठीण झाले. तज्ज्ञांचे आणखी एक मत असे आहे की, दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाच्या क्षेपणास्त्र साठ्यावरही दबाव निर्माण झाला आहे. महागडी क्षेपणास्त्रे वापरून स्वस्त ड्रोन रोखणे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे या हल्ल्याने केवळ मॉस्कोला हादरवले नाही, तर रशियाच्या सुरक्षा व्यवस्थेतील मर्यादाही जगासमोर आणल्या आहेत.