वाशीम,
Washim voter list revision भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील एकूण १० लाख २० हजार २०८ मतदारांच्या तपशीलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून, त्यासाठी १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
भारतीय संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि तिचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मागील दोन दशकांमध्ये केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत होता. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, नवीन नोंदणी आणि वगळण्या झाल्याने काही मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद झाल्याची शयता निर्माण झाली आहे. तसेच मृत व्यक्तींची नावे वगळणे आणि पात्र नागरिकांची अचूक नोंदणी करणे आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत Washim voter list revision २० ते २९ जून २०२६ या कालावधीत गणना अर्जांची छपाई आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन करतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. ३ ऑटोबर २०२६ पर्यंत त्यांचा निपटारा करून ७ ऑटोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
सध्या वाशीम जिल्ह्यातील मतदारांच्या नोंदींची जुळवणी मागील विशेष सखोल पुनरिक्षणातील नोंदींशी करण्याचे काम सुरू असून, आजमितीस ८५.२५ टक्के जुळवणी पूर्ण झाली आहे. गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किमान तीन वेळा भेट देणार असून, त्याची नोंद ठेवली जाणार आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नोंदी पूर्वीच्या नोंदींशी जुळणार नाहीत किंवा जुळवणीत त्रुटी आढळतील, त्यांना मतदान नोंदणी अधिकार्यांमार्फत नोटिसा पाठविण्यात येतील. अशा मतदारांची यादी व संभाव्य कारणे स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, तहसील कार्यालये तसेच संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येतील.
मतदार यादीतील दुबार नावे, मृत मतदारांची नावे वगळणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहावे यासाठी सर्व मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.