महिला सुरक्षेसाठी कठोर कारवाईची मागणी

सोनेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ भाजयुमो युवती मोर्चाचे पोलीस उपायुक्तांना निवेदन

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
womens-safety : सोनेगाव परिसरातील कथित महिला अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर आणि जबरदस्ती विवाह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) नागपूर महानगरच्या युवती मोर्चातर्फे गुरुवारी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 
 

ngp 
 
 
भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो महानगर अध्यक्ष सचिन करारे आणि युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित महिलेवरील कथित लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती धर्मांतर आणि विवाहाच्या आरोपांचा उल्लेख करून या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
 
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला पोलीस पथक कार्यान्वित करणे, दामिनी पथक अधिक सक्रिय करणे तसेच या प्रकरणामागे संघटित रॅकेट किंवा इतर व्यक्तींचा सहभाग असल्यास त्याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
 
पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविली जाईल आणि दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
 
यावेळी भाजयुमोचे महामंत्री रितेश पांडे, ऋषभ अरखेल, सह-युवती प्रमुख प्रतिक्षा घारडे, योगिता बुरडे, संपर्क प्रमुख अंकिता जहांगीरदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.