योगदिनी यशवंत स्टेडियमवर हजारोंचा सामूहिक योगाभ्यास

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ व मनपा चे संयुक्त आयोजन

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
yoga-day : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी ६.३० ते ८ या वेळेत यशवंत स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
 

yog
 
 
 
या कार्यक्रमात योगाभ्यासी मंडळाच्या नागपूरमधील १०७ हून अधिक शाखांतील साधकांसह ब्रह्मकुमारी संस्था, एनसीसी, केंद्रीय राखीव पोलीस दल, प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्र, महानगरपालिका व विविध शासकीय कार्यालयांतील हजारो योगप्रेमी सहभागी होणार आहेत.
 
योगदिनाच्या पार्श्वभूमीवर रामनगर येथील केंद्रात दररोज सकाळी निःशुल्क योगवर्ग सुरू असून, व्हीएनआयटी, एमईसीएल, दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, रिझर्व्ह बँक, रामदेवबाबा विद्यापीठ, रेल्वे, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, राष्ट्रीय आपदा दल आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्येही सराव सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
यशवंत स्टेडियम येथे येणाऱ्या सहभागींसाठी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सामूहिक योगाभ्यासात सहभागी व्हावे, असे आवाहन जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार यांनी केले आहे.