आयपीएलमध्ये युवराजचा ‘रिटर्न शो’

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
yuvrajs return in the ipl इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आल्यामुळे व्यवस्थापन आता नव्या रणनीतीवर काम करत असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज युवराज सिंग याच्या आयपीएलमधील पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षक मंडळात सामील होऊ शकतो आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे.
 
yuvraj
 
युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले असून, विशेषतः अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांच्यासारख्या युवा फलंदाजांच्या कामगिरीत त्याच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवत असल्याची चर्चा आहे. तसेच भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याही संघाशी पुन्हा जोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही त्यांनी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सल्लागार भूमिकेत काम केले आहे.
 
दिल्ली कॅपिटल्सचा मागील हंगाम अपेक्षेप्रमाणे ठरला नाही. १४ पैकी ७ सामने जिंकून आणि ७ सामन्यांत पराभव स्वीकारून संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षक मंडळावरही टीका झाली होती. आता आगामी हंगामासाठी संघ व्यवस्थापन मोठे बदल करून नव्या दमाने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. युवराज सिंगचा संभाव्य समावेश आणि अनुभवी मार्गदर्शकांची भूमिका संघासाठी नवी दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे.