लडाखमध्ये स्वच्छतेसाठी ‘झिरो टॉलरन्स’

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Zero tolerance for uncleanliness in Ladakh लडाखमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी मोठा आणि कडक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर पूर्ण बंदी लागू केली असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे लडाखमधील पर्यटन आणि स्थानिक व्यवस्थापनावर थेट परिणाम होणार आहे. या संदर्भात नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी कठोर निर्देश जारी केले आहेत. त्यांच्या आदेशानुसार प्लास्टिकचा वापर, विक्री आणि वितरण यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थांना आणि व्यक्तींना मोठा दंड भरावा लागेल.
 
uncleanliness in Ladakh
 
 
नव्या नियमांनुसार सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या हॉटेल्स, दुकाने, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास स्वतंत्र दंड आकारला जाईल. पर्यावरण संवर्धनासाठी हे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लडाखच्या संवेदनशील हिमालयीन परिसंस्थेचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या पर्यटनामुळे निर्माण होणारा प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता यामुळे निसर्गावर होणारा परिणाम कमी करणे आवश्यक आहे.
 
 
या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. ते अचानक तपासणी करू शकतील, उल्लंघन ओळखू शकतील आणि थेट दंडात्मक कारवाईही करू शकतील. यात स्थानिक प्रशासन, पर्यावरण विभाग आणि इतर यंत्रणांचा समावेश असेल. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना लडाखचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला दीर्घकालीन हानी होते, त्यामुळे जबाबदार वर्तन आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लडाखमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत पर्यटन यांना मोठा बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.