अमेरिकेत ३० भारतीय ट्रक चालकांना अटक

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन
30 Indian trucks, drivers in America अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या सुमारे ३० भारतीय ट्रक चालकांना संघीय कारवाईदरम्यान अटक करण्यात आली असून त्यांना लवकरच देशातून हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे स्थलांतर नियम आणि वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने (CBP) दिलेल्या माहितीनुसार, ॲरिझोना राज्यातील युमा सेक्टरमध्ये ११ ते १५ मे दरम्यान ‘ऑपरेशन चेकमेट’ राबवण्यात आले. या मोहिमेत एकूण ५२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी ३६ जण व्यावसायिक ट्रक चालक म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. यामध्ये ३० भारतीय नागरिकांचा समावेश असून उर्वरित आरोपी मेक्सिको, एल साल्वाडोर आणि रशिया येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
30 Indian truck
 
 
तपासादरम्यान अनेकांकडे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया यांसारख्या राज्यांचे व्यावसायिक वाहनचालक परवाने आढळले, तर काहींकडे कोणताही वैध परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तींना मागील प्रशासनाच्या काळात मिळालेली काही रोजगार परवानगी कागदपत्रे आता वैध नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीर स्थलांतरितांद्वारे व्यावसायिक वाहने चालवली जात असल्याने रस्ते सुरक्षेला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा चालकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे हे ‘ऑपरेशन चेकमेट’चे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
 
दरम्यान, अमेरिकेच्या परिवहन विभागानेही अलीकडेच परदेशी नागरिकांना व्यावसायिक ट्रक आणि बस चालवण्याच्या परवान्यांवर निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही महिन्यांत भारतीय वंशाच्या काही ट्रक चालकांशी संबंधित गंभीर अपघातांची प्रकरणे समोर आल्यानंतर ही कठोर भूमिका घेण्यात आली आहे.या कारवाईनंतर अमेरिकेत कार्यरत परदेशी चालकांच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थलांतर धोरण अधिक कठोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.