नागपूर,
Sadhu Temple अधिक मासानिमित्त नितीन बरडे यांच्या संकल्पनेतून साधू मंदिरात आयोजित करण्यात आलेली ‘अभंग संध्या’ भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. अभंग, भक्तिगीते आणि रागदारीवर आधारित सुरेल सादरीकरणामुळे उपस्थित रसिकांना अविस्मरणीय संगीतानुभव लाभला. संगीत विशारद तथा संस्कृत प्राध्यापिका अनुराधा पेंडसे सैनिस यांनी आपल्या भावपूर्ण अभंग गायनातून भक्तिरसाची अनुभूती घडवली. तर राधिका पालमवार हिने ‘अमृताहुनी गोड’ आणि ‘मी राधिका’ यांसारख्या लोकप्रिय रचनांचे प्रभावी व सुरेल सादरीकरण करून श्रोत्यांची मनापासून दाद मिळवली.
या दोन्ही गायिकांना तबल्यावर आशिष तळवेकर आणि संवादिनीवर राहुल मानेकर यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कार्यक्रमाचे ओघवते आणि अभ्यासपूर्ण निवेदन प्रकाश वाकेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. प्रा. रवींद्र साधू यांनी मंदिराच्या वतीने कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. या भक्तिमय संगीत सोहळ्यास संगीत क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
सौजन्य: अनिल देव, संपर्क मित्र