जपानी भाषेतून खुलणार जागतिक करिअरची दारे

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
- नागपूर विद्यापीठात संभाषणक्षम जपानी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमला सुरूवात

नागपूर, 
Japanese language जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधींचा वेध घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भाषाशास्त्र, परकीय आणि भारतीय भाषा विभागातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून ‘संभाषणक्षम जपानी भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ सुरू करण्यात येणार आहे. भारत आणि जपान यांच्यात वाढत असलेल्या आर्थिक, औद्योगिक आणि व्यावसायिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी नवी संधी ठरणार आहे.
 
 
uni
जपानी भाषा जाणणाऱ्या कुशल व्यावसायिकांची देश-विदेशात वाढती मागणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या रोजगाराभिमुख कौशल्यविकास धोरणाशी सुसंगत असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यास मदत करणार आहे.
सध्या विद्यापीठाच्या या विभागामार्फत फ्रेंच, जर्मन, रशियन आणि इंग्रजी भाषांमधील एक वर्षांचे प्रमाणपत्र, पदविका आणि प्रगत पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. मात्र नव्याने सुरू होणारा जपानी भाषेचा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा असून त्यात विशेषतः दैनंदिन संवाद आणि व्यावहारिक संभाषण कौशल्यांच्या विकासावर भर दिला जाणार आहे.
- पहिल्या टप्प्यात ३० विद्यार्थ्यांना संधी
या अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला ३० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या वर्षातील प्रतिसादाचा आढावा घेऊन भविष्यात या अभ्यासक्रमाचे रूपांतर अधिक व्यापक पदविका अभ्यासक्रमात करण्याचा विभागाचा मानस आहे.
- अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या नव्या वाटा
apanese language  जपानी भाषेचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यवसाय, पर्यटन, आदरातिथ्य सेवा, विमानन, अनुवाद, दुभाषेगिरी, प्रसारमाध्यमे, ग्राहक संबंध, कॉर्पोरेट संवाद तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जपानमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.