पाकिस्तानचे युरोपकडून कौतुक!

ईयूच्या वरिष्ठ नेत्या काजा कल्लास यांच्या भेटीने चर्चांना उधाण

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Appreciation of Pakistan from Europe भारतासोबत मुक्त व्यापार कराराला गती मिळाल्यानंतर युरोपियन युनियनच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने पाकिस्तानबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्यांमुळे राजनैतिक वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी पाकिस्तान दौऱ्यात देशाच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.दौऱ्यादरम्यान काजा कल्लास यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची भेट घेतली. तसेच त्यांनी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात जाऊन पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासोबतही चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत युरोपियन युनियन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.
 
 
live
 
कल्लास यांनी पाकिस्तानला दक्षिण आशियातील प्रभावशाली प्रादेशिक घटक म्हणून संबोधत, युरोपियन युनियनसाठी तो एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगितले. व्यापार, प्रादेशिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक संवाद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युरोपियन युनियन ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठ्या निर्यात बाजारपेठांपैकी एक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पाकिस्तानला मिळालेल्या GSP+ सुविधेमुळे अनेक उत्पादनांची युरोपीय बाजारपेठेत सवलतीच्या अटींवर निर्यात करता येते. या व्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत असल्याचे मानले जाते.
 
 
 
याशिवाय, अमेरिका आणि इराण यांच्यातील संवाद प्रक्रियेला चालना देण्यासाठी पाकिस्तानने बजावलेल्या भूमिकेचेही काजा कल्लास यांनी कौतुक केले. प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाचे मार्ग खुले ठेवण्यासाठी पाकिस्तानने केलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. युरोपियन युनियनच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पाकिस्तानबाबत व्यक्त करण्यात आलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानचे वाढते महत्त्व आणि युरोपशी त्याचे बळकट होत असलेले संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.