नवी दिल्ली,
CBSE portal down again केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिका पडताळणी प्रक्रियेभोवतीचा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बोर्डाने पुनर्मूल्यांकनासाठीचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले असले, तरी तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पोर्टल सुरू होताच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र, लॉगिन केल्यानंतर स्क्रीन अडकणे, माहिती भरल्यानंतर प्रक्रिया पुढे न जाणे आणि अर्ज पूर्ण न होणे अशा समस्या समोर आल्या. सोशल मीडियावर अनेक विद्यार्थ्यांनी या त्रुटींचे व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट शेअर करत नाराजी व्यक्त केली. काहींनी तर पोर्टलमध्ये प्रवेशच होत नसल्याची तक्रार केली.

यंदा १२वीच्या निकालानंतर उत्तरपत्रिकांची पडताळणी, छायाप्रत मिळवणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज अपेक्षित आहेत. चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर या प्रक्रियेचा परिणाम होत असल्याने पोर्टलमधील अडचणींनी चिंता वाढवली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंदाजानुसार, उत्तरपत्रिका पाहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठा वर्ग पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतो, त्यामुळे अर्जांची संख्या लक्षणीय राहण्याची शक्यता आहे.निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थी आणि पालकांकडून विविध तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. ऑनलाइन शुल्क भरताना अडथळे, अतिरिक्त रकमेची कपात, पावत्या न मिळणे, खाते उघडण्यात येणाऱ्या समस्या तसेच स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मिळण्यात होणारा विलंब याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या उत्तरपत्रिकांच्या प्रती अस्पष्ट असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी उत्तरपत्रिकांतील पाने अपूर्ण असल्याचे किंवा उपलब्ध करून दिलेल्या प्रती मूळ उत्तरांशी जुळत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांनंतरही तांत्रिक अडचणी कायम राहिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.